Thursday, April 13, 2006

गुलामांचा आणि त्यांच्या शोषकांचा धर्म कधीच एक नसतो ,याचा विचार करत गेलो तर एकेकच गोष्ट डोळ्यासमोर येत गेली. हे पृथकत्व एवढं जाणवून गेलं की लिहिल्याशिवाय राहावलं नाही.
पाश्चात्य देशांमध्ये विशेषतः अमेरिकेमध्ये गोरे लोक जाण्याआधी तेथे त्यांचा एक वेगळा धर्म असेल जो गोऱ्या लोकांच्या आक्रमणानंतर काळाच्या ओघात नष्ट झाला,आणि त्यांच्यावर शोषकांचा ख्रिश्चन धर्म लादल्या गेला.
आपल्या देशाच्या संदर्भात विचार केला तर असं दिसून येते की आर्यांच्या आक्रमणापुर्वी इथे सिंधू नदीच्या खोऱ्यात एक अतिशय समृद्ध संस्कृती नांदत होती.दक्षिण भारतातही गोंड संस्कृती,नाग संस्कृती अतिशय भरात होती.परंतु आर्यांच्या आक्रमणानंतर त्यांनी आपला वैदिक धर्म इथल्या मुळ निवास्यांवर लादला.
आर्य हे अग्निपुजक होते. Arctic home in vedas मध्ये टिळकांनी म्हटल्याप्रमाणे आर्य हे उत्तर धृवीय प्रदेशातून भारतात तसेच पर्शियन राष्ट्रांमध्ये गेलेले होते.थंड प्रदेशातून आल्यामुळे अग्निपूजा हे त्यांचे नित्यकर्म झालेली होती.त्याला त्यांनी यज्ञ हे गोंडस नाव देऊन त्याद्वारे त्यांची अग्नीपूजा,मांससेवन,सोमपान ई. क्रिया चालत होत्या.
आर्य हे अतिशय शूर होते म्हणून त्यांनी भारताला जिंकले असा प्रकार नाही तर त्यांच्या विजयाला त्यांचे घोडे मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते. हा प्राणी भारतीयांसाठी नवा होता न त्याच्या वेगाशी स्पर्धा करणारे साधन इथल्या शांतताप्रिय निवाश्यांकडे नव्हते.
यज्ञ हे आर्यांसाठी श्रद्धेचे आणि मौजमजेचे साधन होते परंतु ज्या भूमीवर यज्ञ करण्यात येतो ती भूमी आपल्या ताब्यात आली असे आर्य समजत.त्यामुळे अनार्य यज्ञांना विरोध करत असत. ही गोष्ट आपल्या विविध पुराणांमध्ये आणि दुरदर्शनच्या मालिकांमध्ये दाखवण्यात येते.फक्त अनार्यांच्या ठिकाणी अक्राळ विक्राळ राक्षसांना दाखवून इतिहासाचे करता येईल तेवढे विकृतीकरण केले जाते.'राक्षस' या शब्दाच्या उत्पत्तीतच आपल्या भूमीचे रक्षनण करणारे हा अर्थ स्पष्ट होतो.
हे सर्व झाले त्या काळातील परंतु आजसुद्धा भारतात शोषक आणि गुलामांचा धर्म कसा वेगवेगळा दिसून येतो याचीही अनेक उदाहरणे दिसायला लागली.
परंतु ते कधी नंतर पाहुया .आधी एवढ्या भागावर तर चर्चा होऊ द्या!

Sunday, April 02, 2006

हिंदुंना सामन्यतः आपल्या सहिष्णुतेचा अतिशय अभिमान असलेला दिसून येतो. पण याचा थोडा विचार केला तर यात एक वेगळाच प्रकार दिसून येतो.मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोक त्यांच्या स्वधर्मातील लोकांशी अतिशय सौहार्दाने वागतांना दिसतात.पण इतर धर्मीयांबाबत त्यांचा दृष्टीकोण तितकसा सहिष्णू दिसत नाही.ते इतर धर्मियांना आपल्या धर्मात वळवण्यासठी भरपूर प्रयत्न करतांना दिसतात.याउलट हिंदू इतर धर्मांशी भरपूर सहिष्णुतेने वागतात.ते जेवढ्या श्रद्धेने गणपतीसमोर डोकं टेकवतात तेवढ्याच श्रद्धेने एखाद्या मशिदीत किंवा चर्चमध्येही प्रार्थना करतात.पण स्वधर्मियांसोबत हिंदूंचं वर्तन कसं असतं?धर्मातील उच्चवर्णीय लोक इतर धर्मीयांसोबत भलेही संबंध ठेवतील पण आपल्याच धर्मबांधवांबद्दल त्यांना तितकिशी आपुलकी नसते. महारांनी तर त्यांना नरकसमान वाटणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा सन्मार्ग स्विकारला तरी सवर्ण हिंदूंच्या मनातील त्यंच्या बद्दलचा अकस अजून पुर्ण दूर झाल नाही. अजुनही अभिजनांच्या सभेत बाबासाहेबांचं नाव जरी घेतलं तर कपाळावर आठ्या पडतात,हे कशाचं द्योतक आहे? असहिष्णू असलेल्या इतर धर्मियांना भलेही अश्या पागलाची उपमा देता येईल जे दुसऱ्यांना दगडं मारतात पण हिंदुंचं काय? ते तर अश्या पागलप्रमाणे आहेत जो वेडाच्या भरत आपल्याच हात,पाय आदि अवयवांना चावत आहे. या चर्चेद्वारे मला कुठल्याही धर्माला दोष द्यायचा नाहीये,पण हिंदुंनी त्यांच्या धर्माबद्दल थोडं आत्मचिंतन करावं इतकच हेतू आहे. तो सफ़ल व्हावा इतकीच अपेक्षा!
शिवश्री