Saturday, March 18, 2006

आज फाल्गुन व.द्वितिया! तुकाराम बीज. आजच्याच दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले अशी भाकडकथा आपण ऐकत आलो आहोत.तुकाराम महाराजांच्या काळात लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला यात त्यांची काहीच चुक नाही कारण विज्ञानाशी त्यांचा दुरुनही संबंध नव्हता.आणि मंबाजींसारखे समाजातील लब्धप्रतिष्ठीत लोक खोटं कशाला बोलतील,असाही एक समज होता. पण आजच्या काळात आपण अश्या भाकडकथांवर विश्वास ठेवणे म्हणजे या विज्ञान युगाचा अपमान करणे होय. तुकाराम महाराजांचा धुळवडीच्या दिवशी खून झाला होता,मंबाजी व त्याच्या काही साथीदारांनी त्यांचे प्रेतही सापडू नये अशी व्यवस्था केली होती.पण महाराज गेले कोठे या प्रश्नाला काहीतरी उत्तर शोधणे भाग होते , त्यातूनच या भाकडकथेचा जन्म झाला.यातून त्यांचा दुहेरी फायदा झाला.तात्कालिक फायदा असा की खून पचला आणि त्यापेक्षाही मोठा दिर्घकालीन फायदा असा झाला की त्यांना त्या तुकारामालाही मारता आले जो त्यांच्या विचारांमध्ये जिवंत राहू शकला असता. सदेह वैकुंठगमणाच्या घटनेने तुकारामांची प्रतिमा चमत्कारी बाबांची झाली आणी तेव्हाच त्यांचा खरा मृत्यू झाला. समकालीन धुर्त लोक महान लोकांना अशाच रितीने मारण्याचा प्रयत्न करतात.आधी तर ते त्या व्यक्तीकडे लक्षच देत नाहीत,पण जेव्हा ती व्यक्ती इतकी मोठी होते की तिच्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य ठरते तेव्हा ते त्या व्यक्तीवर टिकेची झोड उठवतात,त्याला परोपरीने बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.(तुकाराम महाराजांकडे वेश्येला पाठवण्याचा प्रकारही याच गटात येतो.)अन् जेव्हा त्या व्यक्तीला बदनाम करणेही अशक्य होते तेव्हा ते त्या व्यक्तीचा जाहीर उदोउदो करून पद्धतशीर तिच्या विचारांना मारतात.म्हणजे ती व्यक्ती फक्त नावाला अमर होते अन् ज्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीनं जन्मभर जीव जाळला ती गोष्ट तशीच राहते. याची अनेक उदाहरणे देता येतील . एक तुकारामांचं तर आहेच,आणखी दोन उदाहरणं जरा नजीकच्या काळातील देतो- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी ! ही दोनीही नेते सध्या संघाचे प्रातःस्मरणीय आहेत. तुकाराम बीजेच्या आजच्या दिवशी आपण अश्या लोकांच्या या धुर्तपणाला थोडंजरी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आजचा दिवस सार्थक होईल.

0 Comments:

Post a Comment

<< Home